मुंबई -छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध झालेला अभिनेता विक्रांत मेस्सी अलिकडेच दीपिका पदुकोणसोबत 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विक्रांतने छोट्या पडद्यावरील मालिकांसोबतच डिजिटल माध्यमातूनही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यामुळेच मोठ्या पडद्यावर त्याची वर्णी लागली आहे. आता तापसीसोबतदेखील तो 'हसिन दिलरुबा' चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.
'हसिन दिलरूबा' हा चित्रपट गूढ हत्येवर आधारित आहे. अभिनेत्री तापसी पन्नू यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. विक्रांत मेस्सी आणि तापसी पन्नु यांनी मुहुर्त शॉटचा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
हेही वाचा - 'असा' होता दीपिकाचा 'मालती' बनण्यापर्यंतचा प्रवास...
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. तापसीने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. 'मिले तो दिल जवाँ निसार हो गया, शिकारी ख़ुद यहाँ, शिकार हो गया', असे कॅप्शन तिने या पोस्टरवर दिले आहे.