मुंबई- मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं.? प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकातील हे गाणं आजही आपण विसरू शकलेलो नाही. कारण आपल्या आजूबाजूचा प्रत्येकजण आज सुखाचा शोध घेताना दिसतो. हाच विषय आपल्या सिनेमासाठी निवडला आहे दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी त्यांच्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या सिनेमामधून. गुरूवारी मुंबईत या सिनेमाचा मुहूर्त पार पडला.
लॉस एंजेलिसमध्ये होणार 'सुख म्हणजे नक्की काय असतं'च्या चित्रीकरणाला सुरूवात
हा सिनेमा अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाची गोष्ट आहे. त्यामुळे सिनेमाचं संपूर्ण शूटींग हे लॉस एंजेलिसमध्ये करण्यात येणार आहे.
हा सिनेमा अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाची गोष्ट आहे. त्यामुळे सिनेमाचं संपूर्ण शूटींग हे लॉस एंजेलिसमध्ये करण्यात येणार आहे. हॉलिवूडमधील एका फिल्म कंपनीसोबत त्यासाठी हातमिळवणी करण्यात आली आहे. तर भारतात अंताक्षरी, सारेगमप यासारख्या सुपरहिट रिएलिटी शोचे जनक गजेंद्र सिंग यांच्या साईबाबा स्टुडिओजमार्फत या सिनेमाची निर्मिती केली गेली आहे. त्यांच्या बॅनरखाली बनणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
अभिनेता अंकुश चौधरी आणि नवोदित अभिनेत्री हिनल पराशर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. याशिवाय सिनेमातील बाकीचे कलावंत हे परदेशातून निवडण्यात आले आहेत. सिनेमासाठी काम करणारे तंत्रज्ञ हेदेखील परदेशी असल्याने संपूर्णपणे हॉलिवूडमध्ये शूट होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा असेल. तर सिनेमाच्या संगीताची जबाबदारी संगीतकार रोहित हळदणकर याच्यावर सोपविण्यात आली आहे.