मुंबई -'विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी यांची एकत्र झलकदेखील ट्रेलरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्पृहा आणि सोनाली पहिल्यांदाच एकत्र भूमिका साकारत आहेत. त्यामुळे दोघींना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
स्पृहा जोशी -सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी आपल्या अभिनयाच्या कौशल्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. दोन्ही अभिनेत्रींच्या नावावर अनेक प्रसिद्ध चित्रपट आहेत. आता 'विक्की वेलिंगकर'मध्ये दोघींची नेमकी भूमिका कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी चित्रपटाची वाट पाहावी लागेल.
हेही वाचा -थुकरटवाडीत अवतरली 'पानिपत'ची टीम, आशुतोष गोवारीकरांनी केलं अरविंद जगताप यांचं कौतुक
६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील अनुभवाबाबत सोनाली आणि स्पृहाने मनसोक्त गप्पा मारल्या. ‘आम्ही दोघींनी ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे, आम्ही दोघी खूप चांगल्या आणि जवळच्या मैत्रिणी आहोत. आम्हाला या चित्रपटात काम करताना खूप मज्जा आली. या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे अशाप्रकारच्या कथेमध्ये पहिल्यांदाच काम करत आहोत. आमचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी या चित्रपटाचे उत्तम प्रकारे दिग्दर्शन केले आहे. विक्की वेलिंगकरमध्ये आमच्या भूमिकेमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की, विक्की ही विद्या शिवाय अपूर्ण आहे. ही भूमिका साकारताना आणि या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. या चित्रपटाबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत’, असे त्या यावेळी म्हणाल्या.
सोनाली कुलकर्णी - स्पृहा जोशी हेही वाचा -'विक्की वेलिंगकर'चं 'डा रा डिंग डिंग ना' हे दुसरं गाणं प्रदर्शित
‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेती आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत ती कशी खंबीरपणे उभे राहते ते पहायला मिळणार आहे.