मुंबई - बॉलिवूडमध्ये 'शोले' म्हटलं की सर्वात आधी आठवते ती म्हणजे 'जय - वीरू'ची मैत्री. 'शोले' चित्रपट आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटाला १५ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सदाबहार आणि क्लासिक सिनेमा म्हणून 'शोले' चित्रपटाची ओळख आहे. या चित्रपटातील संवाद, 'जय-वीरू'ची मैत्री, बसंतीची अखंड बडबड, गब्बरची दहशत आणि ठाकुरची हिम्मत या सर्वांनीच चाहत्यांवर छाप पाडली. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाची आठवण उलगडत एक भावनिक ट्विट केले आहे.
'शोले' चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया भादुरी, अमजद खान, संजीव कुमार यांसारखी स्टारकास्ट होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. तर, या चित्रपटाची निर्मिती त्यांचे वडील जी. पी. सिप्पी यांनी केली होती.