'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा काही दिवसांपूर्वीच समारोप झाला. अनेक वादविवादांनी गाजलेलं हे पर्व यंदा आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिलं. ते म्हणजे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या नात्याला आलेल्या बहरामुळे बिग बॉसचं हे पर्व खास ठरलं. शिव ठाकरेने विजेतेपदाच्या ट्रॉफीवर तर त्याचं नाव कोरलं. पण, यासोबतच बिग बॉसच्या घरात त्याला त्याची राणीदेखील मिळाली आहे. नुकतीच ही राणी म्हणजे वीणाने शिवच्या आईची भेट घेतली आहे.
बिग बॉसच्या घरात सुरू झालेल्या नात्याला घराबाहेर काही स्थान राहत नाही, असंच सर्वांना वाटत असतं. असं बऱ्याचदा झालं देखील आहे. त्यामुळे शिव आणि वीणाचं नातं देखील असंच राहिल, असंच सर्वांना वाटलं होतं. पण, शिव आणि वीणाने सर्वांचा समज दूर करत आपल्या नात्याला पुढे घेऊन जायचं ठरवलं आहे. सुरुवातीला त्यांच्या नात्याला विरोध दर्शवणाऱ्या शिवच्या आईलाही आता वीणा आवडायला लागली आहे. त्यामुळे दोघांच्या लग्नाचा मार्गही मोकळा झाला, असं म्हणता येईल. शिवाय शिवनेही तो फक्त वीणासोबतच लग्न करणार असल्याचे बोलून दाखवले आहे.
वीणाने शिवच्या आईची भेट घेतलेला फोटो शिवने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'राणी मीट आपली जिजाऊ', असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे.