मुंबई -सलमान खानचा 'भारत' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिस गाजवायला सुरुवात केली आहे. 'भारत'ने पहिल्याच दिवशी सलमानच्या ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड पार करत ४२.०३ कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशीदेखील चाहत्यांच्या सिनेमागृहात अक्षरश: उड्या पडल्या. चाहत्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे सलमान खान भारावला आहे. त्याने सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार व्यक्त करत एक ट्विट केलं आहे.
'भारत' चित्रपट हा सलमानच्या करिअरमधला आत्तापर्यंतचा सर्वात जास्त ओपनिंग असलेला चित्रपट ठरला आहे. ईदच्या सुट्टीचाही चित्रपटाला फायदा झाला. तर दुसऱ्या दिवशी देखील कमाईचा आकडा चांगला असल्याचे समीक्षकांनी म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी जवळपास ३० कोटींची कमाई करत 'भारत'ने दोनच दिवसात अर्धशतकापर्यंत मजल मारली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ७२.०३ कोटींची कमाई केली आहे.