मुंबई- सुशांत सिंह राजपूत याने काही दिवसांपूर्वी मुंबईतील राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर आता जवळपास एका आठवड्याने या प्रकरणावर सलमान खाननं प्रतिक्रिया दिली आहे. सलमाननं आपल्या ट्विटमधून आपल्या चाहत्यांना सुशांतच्या चाहत्यांसोबत सहानुभूतीनं वागण्याचं आवाहन केलं आहे.
पोस्टमध्ये सलमाननं लिहिलं, मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो, की सुशांतच्या चाहत्यांसोबत सहानुभूतीनं वागा. सुशांतचे चाहते सध्या वापरत असलेली भाषा आणि अपशब्द याकडे जास्त लक्ष देऊ नका, यामागे असणाऱ्या त्यांच्या भावनांचा विचार करा. कृपया या कठीण काळात त्याच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना सहकार्य करा. कारण, जवळची व्यक्ती गमावणं सर्वाधिक त्रासदायी असतं.
सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याला श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, बाकी काहीही लिहिलं नव्हतं. दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. करण जोहर, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा यांच्यासोबत सलमान खानवरदेखील सोशल मीडियावर लोकांनी टीकेचा भडीमार केला. आपला मेहुणा आयुष शर्मा याला वारंवार संधी दिली आणि अरिजित सिंग, विवेक ओबेरॉय, पुलकित सम्राट, सोहेल खान यांचं करिअर संपवण्यासाठी सलमान खाननेच प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला.
चहुबाजूंनी आरोपांची राळ उठत असतानाच सलमान खान आणि त्याच्या भावंडांनी मिळून मला दबंग 2 पासून दूर नेलं. आपलं करिअर संपण्यासाठी खान कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप दबंगचा दिग्दर्शक अभिनव कश्यप याने केला. या परिस्थितीत सलमान खाननं पाळलेलं मौन त्याच्या चाहत्यांनादेखील खटकत होतं. अद्याप सुशांतच्या आत्महत्येमागील खऱ्या कारणांचा तपास मुंबई पोलीस करत असताना टीकाकारांना उत्तर देण्यापेक्षा सलमानने तूर्तास संयम पाळण्याचा निर्णय घेतला आहे.