मुंबई -बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिला आहे. एकेकाळी तो त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. तर, पुढे त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान अभिनेत्रीशी लग्न केले. आज सैफच्या वाढदिवशी जाणून घेऊयात असेच काही रंजक किस्से....
सैफ त्याच्यासोबत १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंगच्या पाहता क्षणीच प्रेमात पडला होता. त्यानंतर पुढे त्याने तिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. अशातच तो विदेशी मॉडेल रोजालाही डेट करत होता. त्यामुळेच तो एक दिलफेक आशिक म्हणून ओळखला जातो.
सैफची आई शर्मिला टागोर या दिग्गज अभिनेत्री आहेत. तर वडील मंसूर अली खान पतौडी हे सुप्रसिद्ध क्रिकेटर होते.
सैफ अली खान - शर्मिला टागोर सैफने डिजीटल माध्यमातूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'सेक्रेड गेम्स'च्या दोन्ही भागातून तो प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याला एक बहुआयामी अभिनेता म्हणून देखील ओळखले जाते.
सैफ अली खानला १९९३ साली 'आशिक आवारा' या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर अवार्डही मिळाला होता. त्यानंतर त्याचे 'पहचान', 'इम्तिहान', 'ये दिल्लगी' हे चित्रपटही गाजले.
१९९४ साली आलेला 'मै खिलाडी तू अनाडी' चित्रपटातही सैफने भूमिका साकारली. या चित्रपटानंतर अक्षय कुमारसोबत त्याची जोडी तुफान गाजली.
सैफची लव्हलाईफही तेव्हा चांगलीच बहरली होती. त्याने १९९२ साली करिअरच्या सुरुवातीलाच अमृता सिंगसोबत लग्नगाठ बांधून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पुढे त्याचे आणि इटलीची एक मॉडेल रोजा हिच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या २००४ साली सैफ आणि अमृताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांना सारा आणि इब्राहीम ही दोन मुले देखील आहेत.
पुढे सैफच्या आयुष्यात करिनाची एन्ट्री झाली. 'ओमकारा' आणि 'टशन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. २००७ साली ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ५ वर्षे लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, लग्नानंतरही चित्रपटात भूमिका साकारणार, या अटीवर करिनाने सैफसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता. २०१२ साली दोघेही लग्नबंधनात अडकले. २०१६ साली त्यांच्या आयुष्यात तैमुरने एन्ट्री घेतली. आज त्याची लोकप्रियता सैफ आणि करिनापेक्षाही मोठ्या प्रमाणात असल्याची पाहायला मिळते.