मुंबई -बॉलिवूडचं 'क्युट कपल' म्हणून ओळखले जाणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. आज त्यांच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही त्यांचे नाते दिवसेंदिवस बहरताना दिसते. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने हट के अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने शेअर केलेला व्हिडिओ अवघ्या काही क्षणांमध्येच व्हायरल झाला आहे.
रितेशने जेनेलियासोबतचा एक टिकटॉक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये जेनेलिया त्याला त्यांच्या लग्नाचे फोटो दाखवत असते. मात्र, बॅकग्राऊंडला 'जिन जख्मो को वक्त भर चला है, तुम क्यो उन्हे छेडे जा रहे हो', हे गाणे ऐकायला येते. तसेच रितेशचे हावभावही पाहण्यासारखे आहेत. अतिशय मजेदार असेलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांसोबत कलाविश्वातील कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आत्तापर्यंत या व्हिडिओला २ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.
दुसरीकडे जेनेलियाने रितेशसाठी एक खास रोमॅन्टिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे काही खास क्षण कैद केलेले पाहायला मिळतात. तिच्याही व्हिडिओला ३ लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतच बऱ्याच चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.