प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं, 'कागर'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
एकीकडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणाऱ्या कागर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
मुंबई - परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवते ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणते ते राजकारण. एकीकडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणाऱ्या कागर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांच्या याच पार्श्वभूमीवर हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'सैराट' या पहिल्याच चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली प्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल तीन वर्षानंतर रसिकांच्या भेटीला येत आहे. 'कागर' हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार', अशा आरोळ्या देत रिंकू 'कागर'च्या प्रचाराच्या रनधुमाळीत नव्या जोशात उतरली आहे.