मुंबई - '83' या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा गेल्या वर्षीपासून लागून राहिली आहे. 1983 ला जिंकलेल्या विश्वचषकाचा थरार थिएटरमध्ये पाहायला मिळणार असल्यामुळे क्रिकेट रसिकांसह सिनेरसिकही वाट पाहात आहे. अखेर या चित्रपटाचे प्रदर्शन यावर्षी ख्रिसमसला होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 1 किंवा 2 डिसेंबरा रिलीज होणार असल्याचे ट्विट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केले आहे.
या चित्रपटाचे सलग तीन आठवडे प्रमोशन करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतलाय. यासाठी चित्रपटातील कलाकार सहभागी होणार आहे. रणवीर सिंह या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारतोय. त्यामुळे त्याच्या तारखा प्रमोशनसाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे 1 किंवा 2 डिसेंबरला ट्रेलर लॉन्च करण्याचा निर्णय रणवीरच्या तारखांवर ठरणार आहे.
१९८३ साली झालेल्या विश्वचषक सामन्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. २५ जून १९८३ साली भारताने प्रथमच विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले. याच विश्वचषक सामन्यावर आधारित कबीर खान दिग्दर्शित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'८३' चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील भूमिका साकारत आहेत. या सर्व कलाकारांचे फर्स्ट लुक प्रदर्शित झाले आहेत.
हेही वाचा - 'फँड्री'चा झब्या 'फ्री हिट' ठोकण्यासाठी सज्ज, 17 डिसेंबरला थिएटरात देणार 'दणका'