मुंबई - देशभरात सध्या नवरात्रोत्सवाची धुम पाहायला मिळत आहे. ९ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची कलाविश्वातही धुम आहे. आदिशक्तीची पूजा, अर्चना करुन देवीच्या विविध ९ रुपांची या दिवसात पूजा केली जाते. 'स्त्री'ला देखील आदिशक्तीचंच एक रुप मानलं जातं. त्यामुळेच तिचं हेच आदिशक्तीचं रुप दाखवलंय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने.
तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर करवीर निवासिनी अंबाबाईच्या रुपातला एक फोटो शेअर केला आहे. करारी नजर, अर्धवट पाण्यात बुडालेली देवी, आणि तिचं करवीर.... असं रुप दाखवलं आहे. अतिशय वास्तवदर्शी असा हा फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधुन घेत आहे.
या फोटोंसोबत तिने एक कविताही शेअर केली आहे. या कवितेतून तिने आज स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा -राणी मुखर्जीची 'मर्दानी २' मधील दमदार झलक, पाहा टीझर
'याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी. माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी...', 'मी अवतरणार तरी कशी ?' असा प्रश्न उपस्थित करत, शहरीकरण आणि स्वार्थासाठी मानवाने कसे एका दैवी शक्तीचेच हात छाटले त्यावर कटाक्ष टाकला आहे.
'मत्स्येंद्री ने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू', म्हणूनच पुराच्या पाण्यात सारं करवीर उध्वस्त होत असतानाही 'सावरू शकले नाही तुला...', हे वास्तव एका दैवी रुपातून तेजस्विनीने सर्वांसमोर आणलं आहे. देवीच्या मनात या साऱ्याविषयी क्रोधाग्नी असला तरीही शेवटी तीसुद्धा एक आई आहे, कठोर झाले तरी साथ नाही सोडणार... बहरायचं सोडणार नाही, असं लिहत तिने एक वास्तव समोर आणले आहे.
पुढे तिने तिचाही एक फोटो शेअर केला आहे. 'कामाख्या' असं कॅप्शन देत तिने यासोबतही काही ओळी लिहल्या आहेत.
'वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश... प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते.
वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची ) नवनिर्मिती करते तेंव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अश्या प्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेंव्हा त्यासाठी कुणाला जवाबदार ठरवू मी ?' असा जळजळीत प्रश्न तिने या फोटो शेअर करून उपस्थित केला आहे.
हेही वाचा- ठरलं तर! 'या' दिवशी येणार 'तुफान', पाहा फरहान अख्तरची दमदार झलक