मुंबई -कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमायक्रॉन मुळे देशात कोव्हीडची तिसरी लाट येण्याची संभावना आहे.दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे दिल्ली सरकारने तेथील चित्रपटगृहे बंद केली आहेत. त्यामुळे बऱ्याच हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गिरणी कामगारांच्या संपानंतर जगण्यासाठीची धडपड, हार न मानण्याचा मराठी बाणा, लेखक जयंत पवार यांच्या धारदार लेखनशैलीद्वारे कथेमध्ये निर्माण झालेल्या हृदयभेदी नाट्यानं मांजरेकरांना आकर्षित केलं होतं. त्यातून 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाची निर्मीती झाली.
महेश मांजरेकरांचा चित्रपट
समाजातील वास्तववादी घटनांचे दर्शन घडवण्यात अग्रेसर असणाऱ्या निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटाद्वारे सत्य परिस्थिती मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज चहूबाजूला मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. नुकतंच रिलीज करण्यात आलेलं 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचं नवं पोस्टर चित्रपटातील विविध व्यक्तिरेखांचं दर्शन घडवणारं आहे. हे पोस्टर चित्रपटातील काळ आणि वातावरणाची झलक दाखवणारं आहे. 'काँक्रिटच्या जंगलातील उद्ध्वस्त अस्तित्व' ही पोस्टरवरील टॅगलाईन दाहकतेची जाणीव करून देणारी आहे. विविध वयोगटातील चेहरे 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'च्या पोस्टरवर पहायला मिळतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या मनातील वेदना आणि विचार सांगण्यासाठी पुरेसे आहेत. या चित्रपटातील काळ जवळपास तीन दशकांपूर्वीचा आहे. त्या काळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम, त्यांची विदारक परिस्थिती, त्यांनी सहन केलेल्या वेदना, संपामुळं पूर्णत: वाताहत झालेली पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'मध्ये पहायला मिळणार आहेत.