'केसरी saffron' च्या टीजर वरून या चित्रपटात एका सामान्य घरातील पहिलवानाच्या जिद्दीचा प्रवास दिसणार असल्याचे समजते. ‘शाहू महाराजांचे दिवस गेले आता, कसरत, खुराकाचा खर्च सरकार करायचे’ हे वाक्य जयवंत वाडकर म्हणातात तर ‘दुधा शपथ घे, परत कधीच कुस्तीच्या आखाड्यात पाऊल टाकणार नाही’ अशी शपथ उमेश जगताप घालत आहेत. यावरून चित्रपटातील पहिलावानाच्या सभोवतीच्या वातावरणाचा अंदाज येतो तर मध्येच ‘आधीच गावाची घालवलेली इज्जत पुरी झाली नाय व्हय तुम्हाला’ या वाक्यातून कथेत काहीतरी भन्नाट ट्वीस्ट असल्याचे दिसते.
'केसरी saffron' या चित्रपटात विराट मडके याच्यासह महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, नंदेश उमप, उमेश जगताप, छाया कदम, जयवंत वाडकर, नचिकेत पूर्णपात्रे, सत्यप्पा मोरे, ज्ञानरत्न अहिवळे, रूपा बोरगांवकर, पद्मनाभ बिंड यांच्या भूमिका आहेत.
संकलन आणि दिग्दर्शन सुजय डहाकेचे असलेल्या या चित्रपटाचे लेखन नियाज मुजावर यांनी केले आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी, संजय टेम्भूर्णी यांच्या गीतांना मोहन कन्नन, ऋचा बोन्द्रे, जयदीप वैद्य, मनीष राजगिरे यांनी स्वरसाज चढविला आहे. चित्रपटाला पार्श्वसंगीत साकेत कानेटकरने दिले आहे. तर ध्वनी मुद्रण कुणाल लोळसुरे यांनी केले आहे. कलाकारांची वेशभूषा नामदेव वाघमारे, अनुषा वैद्य यांनी तर रंगभूषा संतोष डोंगरे यांनी केली आहे. संदीप जिएन. यादव चित्रपटाचे डीओपी असून 'केसरी saffron' चे निर्माता संतोष रामचंदानी आणि सह निर्माता मनोहर रामचंदानी आहेत.
‘गाव नसना का तुमच्या संगट.. मी तर हाय’ असे म्हणत साथ देणारी मैत्रीण, ‘सामन्यासारखा सराव दररोज केला तर सराव केल्यासारखा सामना निघून जाईल’ असा विश्वास देणारा वस्ताद आणि एका सामान्य कुटुंबातील पाहिलवान ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी काय मेहनत घेतात, संघर्ष करतात याचा उलगडा येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे.