महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सारागढीच्या युद्धातील अतुलनीय शौर्याची गाथा सांगणारा 'केसरी' - dharma production

केसरी रिव्ह्यू

By

Published : Mar 22, 2019, 1:06 PM IST


शीख समुदायात शौर्याच प्रतीक म्हणून नावाजली गेलेली अफगाणिस्तानमधील सारागढी किल्ल्यातील लढाई ही अक्षय कुमारच्या 'केसरी' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर जीवंत झाली आहे. पंजाबी लोकांमध्ये या लढाईला एक अनन्य साधारण महत्त्व असल्याने करणं जोहरने या विषयावर सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांच्या इतिहासात जे महत्व बाजीप्रभू देशपांडेनी पावनखिंड राखण्यासाठी दिलेल्या बलिदानाला किंवा जे महत्त्व तानाजी मालूसरेंनी सिंहगड मिळवण्यासाठी दाखवल्या शौर्याला आहे फक्त त्याच्याशीच या सारगढीच्या लढ्यातील शौर्याशी तुलना होऊ शकेल.

1897 साली भारतावर इंग्रजाच राज्य असताना तत्कालीन भारताची अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमेवर सारागढी हा किल्ला होता. या किल्याचे आणि सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही इंग्रजांच्या सैन्यातील 36 शीख रेजिमेंटकडे होती. या रेजिमेंटचा प्रमुख होता ईश्वर सिंह म्हणजेच अक्षयकुमार. सिनेमा सुरू होत असतानाच त्याच पोस्टिंग या नवीन आणि दूरवर असलेल्या चौकीवर होतं. तिथे पोहोचत असताना तो एका अफगाण स्त्रीची धर्माच्या नावाखाली सुरू असलेली विटंबना थांबवतो आणि वादाची ठिणगी पडते. पुढे तो आपल्या बटालियनला जाऊन भेटतो जी एवढ्या अडनीड्या ठिकाणी आपल्यावर कुणी हल्ला करणार नाही अशा बेतात निर्धास्त असते. मात्र ईश्वर सिंग त्यांना आधी अजवमावतो त्यानंतर त्यांची बलस्थाने हेरतो. दुसरीकडे धर्माच्या नावाखाली इंग्रज सरकार उलथवून लावण्यासाठी सगळे अफगाण एकत्र यायचं ठरवतात. त्यांचं पहिला हल्ला ठरतो तो सारगढी किल्ल्यावर..आणि सुरुवात होते एका आशा युद्धाला ज्यात सगळ्यांचाच मृत्यू अटळ असतो.

सिनेमाची कथा मुळात एक शौर्यकथा असली तरीही त्याचा संदर्भ आता तसा फार जुना झाला आहे. त्यामुळे शीख रेजिमेंट ने दिलेल्या लढ्याला आजच्या पिढीसमोर मांडताना ते 21 शिपायच स्वातंत्र्ययुद्ध असल्याचा मुलामा देऊन ते पेश करण्यात येत. जे काहीस कृत्रिम वाटत. दुसरीकडे ज्यांना या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व माहीत नाही त्याच्यासाठी हा सिनेमा पुन्हा एकदा मोठया पडद्यावर पुन्हा 'बॉर्डर' सिनेमा पहात असल्याचा भास निर्माण करतो. कारण तिथंही शीख रेजिमेंट होती इथेही आहे. तिथेही 600 शीख जवान पाकिस्तानी बटालियन सोबत लढले इथेही 21 शीख 10 हजार पठाण लोकांशी झुंजले. बाकी एका जवनाच मुख्य अधिकाऱ्याशी न पटणे आणि वारंवार जवानांना बायको आणि घरातील आई-वडील लहान मूल यांची आठवण येणे. कायम त्यांचे रुमाल नाहीतर फोटो हातात घेऊन उसासे सोडणे हे त्या जवानांची अगतिकता मांडत असलं तरीही ते एवढे वेळा बॉलिवूड सिनेमात दाखवलं गेलंय. की त्यामुळे पुन्हा ते पडद्यावर पाहताना त्यात आता काही नावीन्य जाणवत नाही. त्यामुळे प्रेक्षक वाट पाहतात ते युध्द पडद्यावर कधी दाखवलं जातंय याची. या बाबतीत मात्र 'केसरी' तुम्हाला अजिबात निराश करत नाही. सारागढीच युद्ध हा या सिनेमाचा आत्मा आहे आणि ते पडद्यावर पाहण्यात खरी गंमत आहे.

अक्षय कुमारने ईश्वर सिंहची भूमिका अतिशय समर्पकपणे साकारली आहे. त्याचा वावर, त्याची संवादफेक आणि जबरदस्त ऍक्शन लाजवाब आहेत. त्याला अधून मधून आठवणीत भेटणाऱ्या पत्नीची भूमिका परिणीती चोप्राने ठीकठाक साकारली आहे. 36 शीख बटालियन मधले 21 शूरवीर सैनिकाच्या भूमिका खरोखर अप्रतिम झाल्यात. सिनेमाचे खरे नायक अक्षयसोबत हे 21 जणही आहेत. निर्माता म्हणून करण जोहरने दिग्दर्शक अभिजित सिंग याच्यावर जो विश्वास दाखवलाय तो त्याने सार्थ ठरवला आहे. सिनेमा त्याने पूर्णपणे प्रामाणिकपणे बनवलेला आहे.

या 21 शूरविराच्या बलिदानाला पंजाबमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. त्यांच्या नावे आजही तिथे दोन गुरुद्वारे सुरू करण्यात आलेत ज्याला आज एखाद्या तिर्थक्षेत्रच स्वरूप आलं आहे. त्यामुळे पंजाब, दिल्ली, हरियाणा, अमेरिका, युके आणि केनडा इथं विखुरलेल्या पंजाबी समुदायाला हा सिनेमा नक्की आवडेल. तुम्ही अक्षयकुमारचे डाय हार्ट फॅन असाल तर तुम्हालाही हा सिनेमा आवडेल. मात्र तुम्ही काहितरी वेगळं पाहण्याची हौस बाळगणारे प्रेक्षक असाल, तर 'केसरी' पाहून तुम्ही किंचित निराश होण्याची शक्यता आहे. कदाचित आधी पाहिलेलीच गोष्ट परत नव्याने पहिल्यासारखही वाटेल. तेव्हा या होळीला शौर्याच्या 'केसरी' रंगात रंगायच की नाही ते तुमचं तुम्हींच ठरवा.

ABOUT THE AUTHOR

...view details