मुंबई- पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले. यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीदरम्यान भारताचे एक मीग २१ विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्याने पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतले. याच कथेवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
पुलवामा हल्ल्यावर आधारित चित्रपटाच्या शीर्षक नोंदणीसाठी निर्मात्यांची गर्दी - uri
मुंबईच्या इंडियन पिक्चर्स प्रॉड्युसर्स असोसिएशनच्या कार्यालयात अनेक प्रोडक्शन हाऊसच्या निर्मात्यांनी याच घटनेवर आधारित चित्रपटांच्या शीर्षकांची नोंदणी केली.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर लगेचच मुंबईच्या इंडियन पिक्चर्स प्रॉड्युसर्स असोसिएशनच्या कार्यालयात अनेक प्रोडक्शन हाऊसच्या निर्मात्यांनी याच घटनेवर आधारित चित्रपटांच्या शीर्षकांची नोंदणी केली. आतापर्यंत 'पुलवामा', 'पुलवामा : द सर्जिकल स्ट्राइक', 'पुलवामा टेरर अटॅक', 'द अटॅक्स ऑफ पुलवामा' यासारख्या शीर्षकांची नोंदणी झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली. यातून प्रेक्षकांचा देशभक्तीवर आधारित चित्रपटांकडील कल पाहता निर्मात्यांनी या चित्रपटासाठी गर्दा केल्याचे समजतं आहे.