वॉशिंग्टन - जगभरात 'किंग ऑफ पॉप' अशी ओळख असणाऱ्या मायकल जॅक्सनचं नाव पुन्हा एकदा विवादात आलयं. अमेरिकेत 'Leaving Neverland' नावाच्या डॉक्युमेंटरीमध्ये/माहितीपटात जॅक्सनबद्दल चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा दावा त्याच्या चाहत्यांनी केला आहे. याचाच निषेध म्हणून वॉशिंग्टनमध्ये चाहत्यांनी निदर्शनं केल्याचं सांगितलं जातयं.
२५ जून २००९ ला जॅक्सनचा अचानक मृत्यू झाला आणि त्याच्या जगभरातल्या चाहत्यांना दुखः अनावर झालं होतं. आता पुन्हा एकदा जॅक्सनचं नाव एका नव्या वादात अडकल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मुळात हा सगळा वाद सुरु झाला तो 'Leaving Neverland' या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीमुळं. आपल्या लहानपणी वेड रॉबसन आणि जेम्स सेफचक या दोघांवर मायकल जॅक्सननं लैंगिक अत्याचार केल्याचं या माहितीपटात सांगण्यात आलयं. नेव्हरलँड हे मायकल जॅक्सनच्या फार्म हाऊसचं नाव आहे. या फार्महाऊसवर लहान मुलांची बरीच खेळणी असल्यानं तिथं कायम मुलं खेळायला येत असल्याचं या माहितीपटात सांगण्यात आलयं. मात्र, काही काळानंतर अचानक मुलाचं फार्महाऊसवर येणं थांबल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.