मुंबई -प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे महत्वाचे स्थान असते. आई सगळ्यांची जागा घेऊ शकते. मात्र, तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. संपूर्ण विश्वात आईला कधीच पर्याय असू शकत नाही. एखादी स्त्री आईच्या जागी असते. सर्वगुण संपन्न अशी ही आई तिच्या अंगी असलेल्या कलागुणांची आवड हाताशी घेऊन ती तिच्या जीवनातील प्रत्येक क्षण जगत असते. एखादा प्रसंग ओढवल्यावर त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी तिच्यातले बळ जागृत होते आणि तो प्रसंग निभावून नेते ती आई असते. याच भावस्पर्शी नात्याला वेगळे वळण देणारा एक मराठी चित्रपट येत आहे. ‘माईज (माई'स) स्पेशल' असे अनोखे नाव असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले.
माई आपल्या मुलांच्या पाठीशी आणि संसारासाठी वेळप्रसंगी आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी तिच्यातील अवगत कलागुण कशी जोपासते याचे महत्व पटवून देणारा हा 'माई's स्पेशल' चित्रपट प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा विषय नक्कीच आहे. आई कुठे काय करते? असे कित्यकेदा रागात बोलून जातो. मात्र, कोणतीही तक्रार न करता ती जबाबदाऱ्या पूर्ण करत असते. परिस्थितीनुसार स्वतःत बदल करते. तिच्यातले आईपण, एक गृहिणी म्हणून मांडलेल्या संसाराला ती गालबोट लागू देत नाही. अशा या आईच्या त्यागाचे मोल जपणारा 'माई's स्पेशल' चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे.
मंगेश नरे हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. तर चित्रपटाची कथा ही लेखक किरण माने आणि नितीन सावळे यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू जसराज-सौरभ सांभाळणार आहेत. "काक माय एंटरटेनमेंट" अंतर्गत निर्माती सौ. मंदाकिनी किशोर काकडे निर्मित आणि महेश कोले प्रस्तुत आई या अत्यंत भावस्पर्शी नात्याला एक वेगळे वळण घेऊन हा चित्रपट असणार आहे. 'माई's स्पेशल' चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 'काक माय एंटरटेनमेंट' निर्मित 'माई's स्पेशल' या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले आहे आणि तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आईचे महत्व सांगणारा मराठी चित्रपट ‘माईज (माई's) स्पेशल'! - entertainment
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आईचे महत्व असते. हेच आईचे महत्व चित्रपटाच्या माध्यमातून मांडणारा ‘माईज (माई'स) स्पेशल' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
माईज (माई's) स्पेशल