मुंबई - दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे कथानक काय आहे, याबद्दलही प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. अशातच आता चित्रपटातील कलाकारांचे वेगवेगळे पोस्टर प्रदर्शित केले जात आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या आलिया भट्ट, माधुरी दीक्षित आणि सोनाक्षी सिन्हा यांचेही खास लूक असलेले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
'कलंक' चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. वरूण धवन, सिद्घार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त हे सर्व या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. त्यांच्या भूमिकेवरुन आता पडदा उठत असताना, अभिनेत्रींचे खास लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. '#Womenof Kalank' असा हॅशटॅग वापरून आज आलिया भट्ट, माधुरी दीक्षित आणि सोनाक्षी सिन्हा यांचे खास लूक रिलीज करण्यात आले आहेत.