मुंबई -बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. या पोस्टरमधून अक्षय कुमारचा फर्स्ट लूकही पाहायला मिळाला. मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी मधेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून माघार घेत, चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास नकार दिला होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे.
'लक्ष्मी बॉम्ब'च्या पोस्टर रिलीजदरम्यान राघव यांना काहीही सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे ते दुखावले गेले होते. त्यांनी याबाबत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट करत चित्रपटातून बाहेर पडत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून ते पुन्हा या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी परतले असल्याचे सांगितले आहे.