मुंबई - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या संगीत कारकिर्दीचे बरेचसे किस्से पाहायला मिळतात. त्यांच्या आवाजाची छाप त्यावेळी इतकी जबरदस्त होती, की प्रत्येक चित्रपटात त्यांच्या आवाजातील एक तरी गाणं असायचं. त्याकाळी कथानकापेक्षा चित्रपटातील गाणी कशी आहेत, यावर भर दिला जायचा. त्यामुळे लतादिदींच्या आवाजातील गाणं आपल्या चित्रपटात असावं, यासाठी निर्माते आग्रही असायचे.
१९६४ ची गोष्ट आहे. लता मंगेशकर यांना 'राजकुमार' या चित्रपटाचं एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं. 'आई बहार दिल है बेकरार', या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी त्या स्टुडिओमध्ये आल्या होत्या. लतादिदी जेव्हा स्टुडिओत आल्या तेव्हा त्यावेळचे सुपरस्टार शम्मी कपूर हे देखील तिथे उपस्थित होते.
शम्मी कपूर हे स्टूडिओत निर्मात्यांशी गप्पा मारत बसले होते. त्यांचं बोलणं लता मंगेशकर यांना आवडलं नाही. चित्रपटाचे निर्माते जी.एन. वेलुमणी यांना लता मंगेशकरांनी ही बाब सांगितली. त्या म्हणाल्या होत्या, की हे अभद्र बोलत आहे. मला असं बोलणं आवडत नाही. त्यांना स्टूडिओच्या बाहेर जायला सांगा. लतादिदींचं हे रुप पाहुन निर्मातेही चक्रावले होते. त्यांना वाटलं, की एवढ्या मोठ्या सुपरस्टारला बाहेर जायला कसं सांगायचं. त्यांनी लतादिदींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निरर्थक ठरला. शेवटी त्यांनी लतादिदींच्या म्हणण्याप्रमाणे शम्मी कपूर यांना बाहेर जायला सांगितलं होतं.
शम्मी कपूर स्टूडिओच्या बाहेर गेल्यानंतर लतादिदींनी हे गाणं रेकॉर्ड केलं. त्यावेळी ते खूप लोकप्रिय झालं. हेही वाचा -गानकोकिळा लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त मराठी कलाकारांच्या शुभेच्छा
लता दिदींच्या गाण्यांमुळे त्याकाळी चित्रपटाची धुम असायची. गाणी हिट झाली म्हणजे चित्रपट हिट झाले, असे त्यावेळी मानले जायचे. वितरकही लतादिदींचं गाणं असल्याशिवाय चित्रपट स्विकारायचे नाही. त्यामुळे निर्मातेही लतादिदींना नाराज करत नसतं.
हा किस्सा लता मंगेशकर यांची बहिण मीनाताई मंगेशकर यांच्या 'दीदी और मै' या पुस्तकात प्रदर्शित करण्यात आला आहे. या पुस्तकाचं पत्रकार अंबरीश मिश्र यांनी हिंदीमध्ये अनुवाद केलं आहे.
हेही वाचा -B'day Spl:मेरी आवाजही पेहचान है मेरी..संगीतात बहरलेली 'स्वरलता'