मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चित्रपटांमध्ये जुन्या गाण्यांचे रिक्रियेटेड व्हर्जन पाहायला मिळतात. रिक्रियेटेड गाण्यांचा नवा ट्रेण्डच बॉलिवूडमध्ये सध्या तयार झाला आहे. लवकरच अजय देवगणचा 'टोटल धमाल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात 'मुंगडा' गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन तयार करण्यात आले आहे. मात्र, लता मंगेशकर यांना हे गाणं आवडलं नाही.
काही दिवसांपूर्वीच 'टोटल धमाल' मधील 'पैसा पैसा' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता 'मुंगडा' गाण्याचेही रिक्रियेटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आले. या गाण्याला चाहत्यांचा थंड प्रतिसाद मिळाला. 'मुंगडा' हे मुळ गाणं उषा मंगेशकर यांनी गायले होते.
या गाण्याबाबत लता मंगेशकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्या एका माध्यमाशी बोलताना म्हणाल्या, की 'आमच्यावेळी गाण्यांना अतिशय काळजीपूर्वक हाताळले जात असे. त्यांना अशाप्रकारे रिक्रियेट करणे चांगली गोष्ट नाही. त्यांच्या गाण्याच्या रिक्रियेशनसाठी त्यांच्याकडून कोणी परवानगीही घेत नाही, असेही त्या म्हणाल्या. मागेही 'मित्रो' चित्रपटात त्यांच्या 'चलते चलते' गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन तयार करण्यात आले होते. तेव्हाही लतादीदींनी ही खंत व्यक्त केली होती.
मुंगडा गाण्याचे संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांनीही त्यांचे मत मांडले. ते म्हणाले, की 'संगीतक्षेत्रात नवी गाणी बनविण्याचा आत्मविश्वास उरला नाही'.
लता मंगेशकर आणि राजेश रोशन यांना उत्तर देताना टोटल धमालचे दिग्दर्शक इंदर कुमार म्हणाले, की 'जेव्हा रोहित शेट्टीने 'गोलमाल अगेन' चित्रपट बनविला होता, तेव्हा त्यात 'निंद चुराई मेरी' हे गाणे तयार करण्यासाठी कोणतेही अप्रुव्हल घेतले नाही. म्यूझिक लेबलजवळ सर्व अधिकार असतात. त्यांचे मालकच गाण्याचे अधिकार ठरवितात', असेही ते म्हणाले.
अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, अनिल कपूर, माधुरी दिक्षित अशी तगडी स्टारकास्ट 'टोटल धमाल' मध्ये पाहायला मिळणार आहे. २२ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.