मुंबई - 'सोनू के टीटू की स्विटी' या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला कार्तिक आर्यन आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते एकच गर्दी करतात. त्याच्या घरासमोरही त्याच्या चाहत्यांचा राबता असतो. विशेषत: तरुणींमध्ये कार्तिकची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. त्याच्या अशाच एका चाहतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कार्तिकच्या मुंबई येथील घरासमोर एका चाहतीनं चक्क गुडघ्यावर बसून त्याला प्रपोज केलं. तिच्या या प्रपोजलनंतर कार्तिकनं तिला हळुवार उभं केलं. तसंच तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला. या व्हिडिओवरुन तो नॅशनल क्रश झाल्याचं स्पष्ट होतं.
या चाहतीसोबत तिच्या काही मैत्रीणीदेखील येथे उपस्थित होत्या. त्यांनी तब्बल १५ दिवस कॉलेजला दांडी मारुन कार्तिकच्या घरासमोर त्याची वाट बघत होत्या. अखेर, कार्तिकने त्यांची भेट घेतली. यावेळी या चाहतीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. जेव्हा कार्तिकने तिला आधार देऊन उभं करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती थरथरायला लागली होती. मात्र, कार्तिकची ही भेट तिला सुखावून गेली.