मुंबई -बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा युनिसेफमध्ये सदिच्छादूत म्हणून कार्यरत आहे. मात्र, तिच्या याच पदावर आता वाद निर्माण झाला आहे. कारण प्रियांकाने भारतीय सैन्य आणि भारत सरकारचे समर्थन केल्यामुळे पाकिस्तानने तिच्यावर आरोप केले आहेत. तसेच तिचे सदिच्छादूत हे पद काढून टाकावे, अशी मागणीही युनिसेफला केली आहे. मात्र, आता तिची पाठराखण करण्यासाठी अभिनेत्री कंगना रनौत समोर आली आहे.
कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कोणत्याही बाबतीत कंगनाचं एखादं असं वक्तव्य असे येतं ज्यामुळे एकतर चर्चा होते, किंवा मग ती वादाच्या भोवऱ्यात अडकते. मात्र, आता तिने प्रियांकाच्या स्पष्टवक्तेपणाची प्रशंसा केली आहे.
भारत-पाकिस्तान वादात अडकलेल्या 'देसी गर्ल'ची कंगनानं केली पाठराखण भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचं समर्थन आणि भारताकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या आण्विक हल्ल्याच्या धमकीचं समर्थन करणाऱ्या प्रियांकाला तिच्या या ठाम भूमिकेसाठी तिला बऱ्याच रोषाचा सामना करावा लागला होता. त्याचविषयी कंगनाने प्रियांकाला पाठिंबा देत आपली प्रतिक्रिया दिली.
'ज्यावेळी तुम्ही एखाद्या जबाबदारीमध्ये अडकलेले असता तेव्हा तुमच्यावर सोपवण्यात आलेली एक जबाबादारी आणि भावना यांचा मेळ साधताना योग्य तो निर्णय घेणं ही सोपी बाब ठरत नाही. मात्र, आपल्यापैकी कितीजण डोक्याने नव्हे तर, मनाने घेतलेल्या निर्णयाचा कौल ऐकतात?', असे वक्तव्य करत तिने प्रियांकाला साथ दिली.
प्रियांकाने भारतीय सैन्यदलाच्या कारवाईच्या समर्थनार्थ केलेल्या या ट्विटनंतर पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी प्रियांकाविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे तिच्या समर्थनार्थ कंगना रनौत पुढे आली आहे.