मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नुतनीकरणासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कंगनाला तातडीनं कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाकडून नकार देण्यात आला आहे. कंगनाने चुकीची याचिका दाखल केली असल्याचा ठपका न्यायालयानं ठेवत पासपोर्टचा अवधी संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली? असा सवाल उपस्थित केला आहे. कंगनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत तिने आपला पासपोर्ट नूतनीकरणासाठी प्रादेशिक पासपोर्ट प्राधिकरणाला आदेश देण्याची मागणी केली होती.
कंगनाच्या पासपोर्ट नुतनीकरणासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब - कंगना रानौत पासपोर्ट
अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नुतनीकरणासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कंगनाला तातडीनं कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाकडून नकार देण्यात आला आहे. कंगनाने चुकीची याचिका दाखल केली असल्याचा ठपका न्यायालयानं ठेवत पासपोर्टचा अवधी संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली? असा सवाल उपस्थित केला आहे.

अॅडव्होकेट रिजवान सिद्दीकी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत रनौतनं म्हटलं होतं की, मुंबईच्या पासपोर्ट प्राधिकरण विभागाने तिचा पासपोर्ट रिन्यू करण्यास नकार दिला. यासाठी वांद्रे पोलिसांनी तिच्यावर देशद्रोहाचे आरोप आणि द्वेषपूर्ण ट्वीट केल्याबद्दल तिच्यावर एफआयआर नोंदविल्याचं कारण तिला देण्यात आलंय. कंगनाने म्हटलं होतं की, की 'धाकड' या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी कंगनाला 15 जून ते 30 ऑगस्ट हंगेरीला आणि बुडापेस्टला रवाना व्हायचे होते, मात्र पासपोर्ट सप्टेंबर 2021 पर्यंतच वैध असल्यानं कंगनाला प्रवासात अडचणी येत होत्या. त्यामुळे कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परदेशवारीसाठी परत येण्याच्या तारखेपासून कोणत्याही व्यक्तीची पासपोर्ट हा किमान सहा महिने वैध असणं आवश्यक असतं. अन्यथा त्या व्यक्तीला परदेशी जाण्याची परवानगी मिळत नाही. कंगनाची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे त्यामुळे चित्रपटाचं उर्वरीत चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी कंगनाला तातडीनं ही परदेशवारी करणं आवश्यक असल्यानं तिनं कोर्टाला सांगितलं होतं. यावर सिनेमाच्या चित्रकरणाच्या तारखा बदलता येतात,असं कोर्टाकडून म्हटलं गेलंय.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मुनावर अली सय्यद या बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरनं कंगनाविरोधात तक्रार केली होती. सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून मुंबई पोलिसांत दाखल झालेल्या या तक्रारीवरून वांद्रे पोलीस स्थानकांत कंगनाविरोधात आयपीसी कलम 153(अ) अंतर्गत वर्णद्वेषी टिप्पण करून समाजात जातीय तेढ निर्माण करणं, 295(अ) अंतर्गत लोकांच्या धार्मिक भावना दुखावणं आणि 124 (अ) अंतर्गत देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी तसेच हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधातही कंगनानं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिका प्रलंबित असून हायकोर्टानं कंगनाला तूर्तास अटकेपासून दिलासा दिलेला आहे.