मुंबई- 'खाकी' चित्रपटातल्या 'कॉन्स्टेबल सावंत' पासून ते 'दगडी चाळ' चित्रपटामधल्या 'इन्स्पेक्टर काळे'पर्यंत अनेक हिंदी, मराठी सिनेमात कमलेश सावंत यांनी 'पोलिसांची' व्यक्तिरेखा साकारली. त्यातही 'दृश्यम' मधला 'इन्स्पेक्टर गायतोंडे' जास्त भाव खाऊन गेला. आता 'सिनियर सिटीझन' या नवीन चित्रपटात कमलेश सावंत पुन्हा एकदा पोलिसांची भूमिका साकारत आहे.
'सिनियर सिटीझन' हा सिनेमा निवृत्ती लष्कर अधिकारी अभय देशपांडे यांनी त्यांच्या पत्नीसोबत समाजात असणाऱ्या वाईट विचारांविरुद्ध पुकारलेल्या लढ्यावर आधारित आहे. कमलेश सावंत त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगतात, मी साकारत असलेला पी.आय कोल्हे गडचिरोलीच्या छोट्या आणि ग्रामीण भाग असलेल्या जिल्ह्यातून आला आहे. कॉन्स्टेबल म्हणून सुरुवातीला रुजू झालेला कॉन्स्टेबल कोल्हे बढती घेत पी.आय पदापर्यंत पोहचतो.
गरिबीतून वर आल्यामुळे त्याला लोकांच्या दुःखाची आणि कष्टाची जाणीव आहे. अतिशय साधा, हळवा आणि तितकाच कणखर असा हा पी. आय. कोल्हे बदली झाल्यामुळे मुंबईत येतो. मुंबईत आल्यानंतर एका वळणावर माझी आणि अभय देशपांडे सरांची भेट होते. त्यांच्या लढ्यात हा पी. आय. कोल्हे त्यांना कशी मदत करतो. हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.
मोहन जोशी सर आणि स्मिता ताई यांच्या सोबत या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल अजय सरांचे खूप आभार. अशा दिगज्ज कलाकारांसोबत काम करणे म्हणजे विद्यापीठात शिक्षण घेण्यासारखे असते. ही संधी मला या सिनेमामुळे मिळाली. कोणतीही व्यक्तिरेखा त्यातही पोलीस व्यक्तिरेखा साकारताना मी माझ्या मागील व्यक्तिरेखेपेक्षा ही व्यक्तिरेखा कशी अधिक सरस ठरेल याची काळजी घेतो, असे कमलेश याने सांगितले.
'सिनियर सिटीझन या चित्रपटात मोहन जोशी यांच्या व्यतिरिक्त स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार, आशिष पवार, कमलेश सावंत या चित्रपटात दिसणार आहेत. येत्या 13 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होत आहे.