काश्मीरमध्ये जनचाचणीच्या मुद्यावर कमल हासन यांची कोलांटी उडी - नवी दिल्ली
काश्मीरी जनतेची जनमत चाचणी घ्यावी असे मत कमल हासन यांनी व्यक्त केले होते. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर त्यांनी आपले मत बदलले आहे. जनमत चाचणीची गरज नाही आणि काश्मिर देशाचा अविभाज्य भाग असल्याचे हासन यांनी म्हटले आहे.
कमल हासन म्हणाले, ''भारत काश्मीरमध्ये जनमत का घेत नाही. सरकार कोणाला घाबरते ?" भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील राज्यकर्त्यांना जबाबदार धरत हासन म्हणाले, "या दोन्ही राज्यकर्त्यांनी योग्य व्यवहार केला तर एकही सैनिक मरण्याची आवश्यकता नाही.''
हासन म्हणाले, ''जनमत चाचणी घ्या आणि लोकांशी बातचीत करा. सरकारने हे का केले नाही ? ते कशाला घाबरतात. त्यांना राष्ट्राचे विभाजन करायचे आहे का ? त्यांना ( काश्मीर जनता ) परत एकदा का विचारत नाही ? आता हा काश्मिर भारताचा आहे, हीच स्थिती सीमेपलीकडे ( पाक व्याप्त काश्मिर ) देखील आहे. आझाद काश्मीरमध्ये ते जिहादींचे फोटो गाड्यांमध्ये हिरो म्हणून मिरवीत आहेत, हादेखील मुर्खपणा आहे.''
हासन म्हणाले, "भारतदेखील मुर्खतापूर्ण व्यवहार करतो ते ठीक नाही. भारत एक चांगला देश आहे असे म्हणत असू तर अशा प्रकारचा व्यवहार करता कामा नये. तिथे राजकारण सुरू होते, राजकारणाची नवी संस्कृती बनत असते." कमल हासन चेन्नईत बोलत होते.
कमल हासन पुढे म्हणाले, "सैन्याचे लोक काश्मीरमध्ये मरायला जातात, असे जेव्हा लोक बोलतात त्यामुळे मला पश्चाताप होतो. लढणे बंद करा. गेल्या १० वर्षातील सभ्यतेने हे शिकवले नाही ? सैनिकांनी का मेले पाहिजे ? आमच्या घरच्या रक्षकाला का मेले पाहिजे ? दोन्ही पक्षाच्या राज्यकर्त्यांनी योग्य व्यवहार केला तर एकही सैनिक मरणार नाही. नियंत्रण रेषा नियंत्रणात राहिल. त्याची छेडछाड नेहमी करीत आहोत."