मुंबई -ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी एलिझाबेथ या हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटासाठी अभिनेत्री केट ब्लँशेटची निवड शेखर यांनी केली होती. मात्र निर्माता स्टुडिओने याला विरोध केला. कारण त्यावेळी ब्लँशेट ही नवखी कलाकार होती आणि स्टुडिओला स्टार कलाकाराची निवड करायची होती. हा किस्सा सध्या सुरू असलेल्या बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादानंतर कपूर यांनी सांगितला आहे.
"एलिझाबेथ हा माझा पहिला हॉलिवूड चित्रपट होता. मी एलिझाबेथची भूमिका साकारू इच्छित असलेल्या केट ब्लँशेट नावाची एक अज्ञात मुलगी पाहिली होती. माझ्या एजंटने सांगितले की स्टुडिओला एक लोकप्रिय स्टार पाहिजे होती आणि मी एखाद्या अज्ञात अभिनेत्रीचा आग्रह धरला तर ते मलाच बदलतील. मी म्हटलं मी जे मनापासून ठरवलंय तेच घडणार. बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे," असे शेखर कपूर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
एलिझाबेथ या हॉलिवूड चित्रपटातील भूमिकेमुळे ब्लँशेटला जागतिक ख्याती मिळाली, त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून बाफ्टाचा पुरस्कार मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रकारात तिला प्रथम ऑस्कर नामांकन मिळालं.
दिग्दर्शक आर. बाल्की यांनी घराणेशाहीच्या चर्चेत बॉलिवूड स्टार किड्सचा बचाव केल्यानंतर शेखर कपूरचे हे ट्विट आले आहे.