मुंबई -सलग ४ दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कलाक्षेत्रालाही फटका बसला आहे. या पावसामुळे बऱ्याच टीव्ही मालिकांचे शुटींग रद्द करण्यात आले आहे.
मालिकांच्या शुटिंगचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्मसिटीला या पावसाचा मोठा फटका बसलाय. मात्र तरीही या चित्रनगरी मध्ये शूट होणारी 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकांची शुटिंग आजही सुरू आहेत. मात्र, कलर्स मराठीवरील 'बाळूमामाच्या नावान चांगभलं' या मालिकेचं बहुतांश शुटिंग आउटडोअर होत असल्याने या मालिकेच्या निर्मात्यांनी शुटिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आजकाल बऱ्याचशा मराठी मालिकाच शुटिंग ठाण्यातील घोडबंदर परिसरात ओवळा परिसरात होत. ठाण्यात प्रचंड पाऊस झाल्याने त्याचा फटका या मालिकांच्या चित्रीकरणाला बसलाय. झी युवा वरील 'फुलपाखरू' आणि 'वर्तुळ' या मालिकांनी सेटवर येण्याचे रस्ते जलमय झाल्यामुळे आपलं चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर 'ह. म. बने तु. म.बने' आणि 'घाडगे अँड सून' या मालिकांची घोडबंदर रोडवरील शुटिंगसही आज रद्द करण्यात आली आहेत.