प्रियांका चोप्राने मिस वर्ल्ड जिंकून भारताचे नाव जगभरात गौरवांकित केले. मॉडेलिंग, मग बॉलिवूड आणि आता हॉलिवूडमध्ये स्थिरावलेली ही अभिनेत्री राहते परदेशी पण मनाने आहे संपूर्णतः देशी. बॉलिवूड मध्ये ६०+ चित्रपट करून तिने हॉलिवूडची कास पकडली. तिथेही आपल्या व्यक्तिमत्वाने आणि अभिनयाने सर्वांना भुरळ घातलीय. अमेरिकेतील सुप्रसिद्ध गायक निक जोनाससोबत तिने लग्नगाठ बांधली आणि ती हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील दरी मिटविण्याचा प्रयत्न करतेय. हल्लीच तिचा अभिनय असलेला 'द व्हाइट टायगर' प्रदर्शित झाला होता आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर कौतुक मिळाले होते.
‘फोर्ब्स १०० मोस्ट इन्फ्लुएन्शियल’ च्या कव्हरवर झळकणारी ती पहिली भारतीय महिला होती. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोप्रा जोनास सलग दोनदा ‘फोर्ब्स १०० मोस्ट पॉवरफुल विमेन लिस्ट’ मध्ये लागोपाठ दोन वर्ष निवडली गेली होती. या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळविणारी ती पहिली भारतीय कलाकार होती. भारतामध्ये तिच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मश्रीने सन्मान केला गेला. तिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या मोठ्या यशस्वी आणि प्रभावी कामगिरीमुळे प्रियंका चोप्रा जोनासला भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूडला जागतिक नकाशावर ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रियंकाला २०१६ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून पद्मश्री किताब प्रदान करण्यात आला.
फॅशन इंडस्ट्रीमधील ‘वोग युएस’ हे अत्यंत प्रतिष्ठित मानले जाणारे मॅगझीन आहे. २०१८ साली या मासिकाच्या मुखपृष्ठावर छापली गेलेली ती पहिली दक्षिण आशियाई महिला होती. म्हणजेच ही ग्लोबल स्टार ‘वोग युएस’ फॅशन मासिकाच्या कव्हर पेजवर वैशिष्ट्यीकृत केलेली पहिली भारतीय महिला होती. प्रियांका चोप्रा ने आपला हॉलिवूड प्रवास ‘क्वांटिको’ या अमेरिकन टेलिव्हिजन मालिकेपासून सुरु केला. तिच्या एफबीआय ऑफिसरच्या भूमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या भूमिकेसाठी तिला अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. प्रियंकाने ‘फेव्हरिट ऍक्ट्रेस इन अ न्यू सिरीज’ हा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली दक्षिण आशियाई महिला होती.