मुंबई- दुष्काळाचे चटके यावर्षी संपूर्ण महाराष्ट्राला बसायला लागले आहेत. त्यामुळे याच परिस्थितीवर भाष्य करून डोळ्यात अंजन घालण्याचं काम करणाऱ्या एक होत पाणी या सिनेमाचा पहिला टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमातील बालकलाकार चैत्रा भुजबळ हिच्या वाढदिवसाच निमित्त साधून हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
दुष्काळाचं जळजळीत वास्तव मांडणाऱ्या 'एक होत पाणी' सिनेमाचा टीझर लाँच
एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट आणि त्यासाठी जबाबदार असलेले सामाजिक आणि राजकीय संबंध उलगडून सांगण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे करण्यात आला आहे.
एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट आणि त्यासाठी जबाबदार असलेले सामाजिक आणि राजकीय संबंध उलगडून सांगण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे करण्यात आला आहे. व्ही पी वर्ल्ड मुव्हीजचे डॉ. प्रवीण भुजबळ आणि विजय तिवारी निर्मित या सिनेमाचं दिग्दर्शन रोहन सातघरे यांनी केलं आहे. आशिष निनगुरकर यांनी या सिनेमाचं संवाद लेखन केले असून अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हल आणि नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये या सिनेमाची दखल घेण्यात आली आहे.
या सिनेमात अनंत जोग, हंसराज जगताप, उपेंद्र दाते, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, त्रिशा पाटील आणि शीतल कोल्हापूरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. गावागावात भेडसावणारा पाणीप्रश्न गंभीर होण्यापूर्वी सगळ्यांनी एकत्र येऊन पाणी वाचवलं पाहिजे असा, संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. लवकरच हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे.