मुंबई - लोकसभा आणि विधानसभांच्या जेव्हा निवडणूका येतात तेव्हा अनेक राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी कलावंत आणि खेळाडूंचा स्टार प्रचारक म्हणून उपयोग करतात. याचा चांगला लाभ झाल्याची उदाहरणे आहे. इतकेच नाही तर त्यांना उमेद्वारी देऊन निवडणूक जिंकण्याचाही प्रयोग यशस्वी झालेला दिसतो. जिथे विरोधक भक्कम असतात, त्या ठिकाणी लोकप्रिय कलाकार निवडणूकीला उभे केल्याचा फायदा त्या पक्षाच्या पथ्यावर पडल्याची बरीच उदाहरणे आहे. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, हेमा मालिनी, धर्मेंद्र, गोविंदा, जयाप्रदा, चिरंजीवी यांच्यासारखे लोकप्रिय कलाकार संसदेत पोहोचले होते.
सध्या सुरु असलेल्या निवडणूकीतही मुंबईतून उर्मिला मातोंडकर, पटना साहिबमधून शत्रुघ्न सिन्हा यांना काँग्रेसने उमेद्वारी दिली आहे. तर गुरुदासपूरमधून सनी देओल, मथूरेतून हेमा मालिनी, चंदीगडमधून किरण खेर यांना भाजपने उमेद्वारी दिली आहे. जयाप्रदा यावेळी भाजपकडून लोकसभा लढवीत आहेत. त्यांनी यापूर्वी तेलुगु देसम, समाजवादी पक्षाकडून खासदारकीचा लाभ उठवला होता. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अभिनेता अमोल कोल्हे निवडणूकीच्या मैदानात उतरला आहे.
सिने कलाकारांचा अधिक प्रभाव दाक्षिणात्य राज्यात दिसून येतो. नेमके याची नस ओळखूनच कलाकारांनी राजकारणात आपला उत्तम उपयोग करुन घेतला. तामिळनाडू याबाबतीत आघाडीवर आहे. एम जी रामचंद्रन यांची प्रचंड लोकप्रियता होती. याचा लाभ त्यांना पुरेपुर झाला. ते आपल्या लोकप्रियतेच्या बळावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एम के करुणानिधींनीदेखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्रीपदाची धरा सांभाळली. हीच परंपरा पुढे जयललीता यांनीदेखील चालवली. या तिनही मुख्यमंत्र्यांची कारकिर्द उत्तम राहिली आहे. लगतच्या आंध्रप्रदेश राज्यातही तत्कालिन सुपरस्टार एन टी रामाराव यांनी तेलुगु देसम पक्षाची स्थापना करुन काँग्रेसच्या सत्ताधिशांनी जबरदस्त धक्का दिला होता. आणिबाणीनंतर काँग्रेस विरोधी लाटेवर स्वार होत एनटीआर मुख्यमंत्री झाले. त्यांची प्रचंड लोकप्रियता राजकारात फायदेशीर ठरली आणि त्यांनी उत्तम काम या राज्यासाठी केले.