मुंबई- ठाण्यातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झालेले असतानाच आता मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरनं याविरोधात आवाज उठवला आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरून चिन्मयनं भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने राजकारण्यांवरही निशाणा साधला आहे.
आमची दुर्दशा अन् नेते बॅनर लावण्यात व्यग्र, वाहतूक कोंडीनं चिन्मय मांडलेकर संतापला - अभूतपूर्व खड्डे
आमच्या दुर्दशेची अनेक कारणं आहेत आणि अशात आमचे सगळे नेते बॅनर लावून एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात किंवा आम्हा पामरांना सणांच्या शुभेच्छा देण्यात गुंतले आहेत, अशी पोस्ट शेअर करत त्यानं ठाण्यातील रस्त्यांची सध्याची स्थिती मांडली आहे.
चिन्मय आपल्या पोस्टमध्ये म्हणाला, विलेपार्ले येथे तासाभराची मीटिंग संपवून ७:२९ ला निघालो. ठाण्याला पोहोचण्याची वेळ ११:२८...४ तास! आणि आता हे ठाणेकरांचं रोजचंच मरण झालेलं आहे. मेट्रो आणि सेवा रस्त्यांची एकाचवेळी काढलेली अनियोजित कामं, रस्त्यांना आणि पुलांवर पडलेले अभूतपूर्व खड्डे, सगळे नियम फाट्यावर मारुन शहरात कधीही घुसणारी अवजड वाहनं आणि या मरणातही आमच्या टाळूवरचं लोणी खाणारे जाचक टोलनाके, ज्यांनी पिवळ्या पट्ट्याचा नियम कधीच कचरापेटीत फेकला आहे.
आमच्या दुर्दशेची अनेक कारणं आहेत आणि अशात आमचे सगळे नेते बॅनर लावून एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात किंवा आम्हा पामरांना सणांच्या शुभेच्छा देण्यात गुंतले आहेत. या राक्षसी कोंडीबद्दल बोलताना कुणीच दिसत नाही. बहुतेक आमच्या रखडलेल्या वाहनांमध्येच एकदिवशी आमची स्मारकं उभी रहाणार, अशी पोस्ट शेअर करत त्यानं ठाण्यातील रस्त्यांची सध्याची स्थिती मांडली आहे.