ठाणे - 'गप्पांची मैफिल' ज्यात निरनिराळी दर्जेदार गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. त्या गाण्यांबद्दल मारलेल्या गप्पा ऐकण्याची सुवर्णसंधी सुद्धा मिळते. अशा मैफलीचा आनंद डोंबिवलीकर रसिकांनी घेतला, निमित्त होते अक्षरा क्रिएशन्स प्रस्तुत जयदीप बगवाडकर दिग्दर्शित 'शब्दांचा कॅफे' या आगळ्यावेगळ्या मैफलीचे. प्रसिद्ध लेखिका, कवियत्री अश्विनी शेंडेचा प्रवास या निमित्ताने रसिकांनी अनुभवला. त्याचबरोबर गीतांची मैफिलही अनुभवले. आदित्य मंगल सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला.
सुप्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर याने यावेळी अश्विनीला बोलते केले. याचबरोबर मेघना एरंडे हिची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. यावेळी मेघनाने वेगवेगळे डबिंगमधील आवाज काढून दाखवत रसिकांना मंत्रमुग्ध केले. याचबरोबर अभिजित खांडकेकरने स्वतःच्या खास शैलीत रसिकांशी गप्पा मारत मैफलीत रंग भरला.
हेही वाचा- 'पुणे तिथे काय उणे' : पीएमपी बस थांबवून तरुणीने केला 'टिकटॉक' व्हिडिओ
सामान्य रसिकांना चित्रपटातील किंवा गाण्यातील संगीतकार, गायक लक्षात असतात. मात्र, त्या गाण्याला जन्म देणारा गीतकार अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे या गीतकारांना प्रकाशात आणण्याचा हा एक प्रयत्न होता. गीतलेखनामागची संकल्पना, निर्मितीमधील किस्से, त्याचबरोबर काम करताना आलेले अनुभव मिळालेली दाद, याचे वर्णन यावेळी अश्विनीने केले.
अश्विनी शेंडे आणि अभिजित खांडकेकर जयदीप बगवाडकर आणि योगिता गोडबोले यांनी यावेळी सुरेल गीते रसिकांसमोर सादर केली. 'परीकथेच्या पऱ्या', 'गोंधळाला ये', 'सावर रे', यांसारखी एकापेक्षा एक सरस गाणी यावेळी सादर झाली. अधिकाधिक रसिकांसमोर हा कार्यक्रम पोचवण्याचा प्रयत्न असल्याचे जयदीपने यावेळी सांगितले. हेही वाचा -'उजडा चमन' : पाहा, टक्कल पडलेल्या तरुणाच्या लगीन घाईचा ट्रेलर