मुंबई -बॉलिवूडमध्ये रोमॅन्टिक आणि भावनिक गाण्यांचा आवाज म्हणजे अरिजीत सिंग. हिंदीसह अनेक भाषांमधील गाणी त्याने गायली आहेत. आज आघाडीच्या गायकांमध्ये अरिजीतचे नाव अव्वल आहे. अलिकडेच त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला आहे. आज त्याचा ३२ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...
अरिजीत सिंगचा जन्म २५ एप्रिल १९८७ मध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील जियागंज मध्ये झाला. त्याचे वडील पंजाबी आणि आई बंगाली आहे. अरिजीतने २००५ साली गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. गायनासोबतच तो गिटार, पियानो आणि तबला या वाद्यातही पारंगत आहे. तसेच, त्याने संगीत दिग्दर्शक, स्कोर कम्पोजर, संगीत निर्माता यातही त्याने प्रसिद्धी मिळवली आहे.
असा सुरु झाला गायनाचा प्रवास
अरिजीत २००५ साली 'गुरुकुल' या संगीत रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. दिग्दर्शक संजय लिला भन्साळी आणि चित्रपट निर्माते रमेश कुमार तौरानी यांनी त्याला गायनाची पहिली संधी दिली होती. 'सांवरिया' चित्रपटातील 'युं शबनमी' हे पहिले गाणे अरिजीतने गायले होते. त्यानंतर २०१३ साली त्या 'म्युझिक मिर्ची' अवार्डवर आपले नाव कोरले. 'बर्फी' चित्रपटातील 'फिर ले आया दिल' आणि 'शांघाय' चित्रपटातील 'दुआं' या गाण्यांसाठीही त्याला पुरस्कार मिळाला.
अरिजीतच्या करिअरचा ग्राफ त्यानंतर उंचावतच गेला. २०१३ साली 'आशिकी-२' चित्रपटानंतर त्याला सुपरस्टार म्हणून लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील 'तुम ही हो' आणि 'चाहु मै या ना' ही दोन्हीही गाणी तुफान हिट झाली. त्याने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. शंकर एहसान लॉय, विशाल-शेखर, मिथुन, मोंटी, आणि प्रितम यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर त्याला काम करण्याची संधी मिळाली.
आज त्याला संगीत क्षेत्रात १५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्याच्या सुपरहिट गाण्याची यादी आज फार मोठी आहे. मात्र, एका कार्यक्रमादरम्यान त्याला प्रश्न विचारण्यात आला होता, की तो स्वत:ची गाणी कधी एकतो का? या प्रश्नावर त्याने फार मजेशीर उत्तर दिले होते. तो म्हणाला होता, मला माझीच गाणी ऐकुन भीती वाटते. एवढंच काय, तर माझी पत्नीदेखील माझे गाणे ऐकत नाही. त्याचे हे उत्तर ऐकुन उपस्थित सर्वजणांना आश्चर्याचा धक्का बसला नसेल, तर नवल.