मुंबई -सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र, काही जणांनी त्यांच्या या पुरस्काराला विरोध केला आहे. काही वर्षांपूर्वीच भारताचे नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तीला 'पद्मश्री' पुरस्कार का देण्यात येत आहे, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. तर, काहींनी अदनान यांच्या वडिलांचे उदाहरण देऊन त्यांच्या पुरस्काराचा विरोध करत त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. या सर्व ट्रोलर्सला अदनान यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
'माझ्या तत्त्वांत अशा प्रकारच्या गोष्टींना कोणतेही महत्त्व नाही. लोक काहीतरी म्हणत असतात आणि त्यांचं ते नेहमीचंच काम आहे. आपण सर्वांनाच आनंदी नाही ठेवू शकत. मात्र, मला मिळालेल्या सन्मानामुळे मी फार आनंदी आहे. ही गोष्ट माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी मी चाहत्यांचे आणि भारत सरकारचे आभार मानतो', असे अदनान यांनी म्हटले आहे.