मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन 'मनमर्जिया' चित्रपटानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. या चित्रपटाचं शिर्षक अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, अभिषेकने एक फोटो शेअर करुन शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.
अभिषेकच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन कुकी गुलाटी करणार आहेत. तर, अजय देवगन फिल्म्सच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. 'नविन प्रवास नवी सुरुवात', असं कॅप्शन देत अभिषेकने चाहत्यांच्या शुभेच्छा मागितल्या आहेत.
अजय देवगन आणि अभिषेकने 'बोल बच्चन' या चित्रपटात भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. कुकी गुलाटी यांनी यापूर्वी 'प्रिन्स' आणि 'प्यारे मोहन' यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आता अभिषेकसोबत ते आगामी चित्रपटाची तयारी करत आहेत.