मुंबई -बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा मागच्या वर्षी 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आमिर एका मोठ्या हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत होता. लवकरच तो 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे.
आमिर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित, भूमिकेसाठी घटवले वजन - forest gump
आमिर एका मोठ्या हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत होता. लवकरच तो 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चव्हाण करणार आहे. यापूर्वी अद्वैत यांनी 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची कथा अतुल कुलकर्णी यांची आहे.
आमिर खानने 'लाल सिंग चढ्ढा'च्या पात्रासाठी आपले वजनही घटवण्यास सुरूवात केली आहे. या चित्रपटासाठी तो तब्बल २० किलो वजन घटवणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ह्रतिक रोशनचा 'क्रिश-४' चित्रपटही ख्रिसमसच्या पर्वावर रिलीज होणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमिर खानसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसेल, हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. तरी, लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.