मुंबई : देशातील सर्वात मोठी फिल्म प्रॉडक्शन कंपनी अशी ओळख असलेली यशराज फिल्म्स आपला 50वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या खास प्रसंगी कंपनीचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक आदित्य चोप्रा यांनी टीझरद्वारे नव्या लोगोचे अनावरण केले. या 37 सेकंदाच्या टीझरमध्ये यशराजच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची झलक दर्शविली गेली आहे. चित्र समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्शनेही आपल्या टीव्ही हँडलवर हा टीझर शेअर केला आहे.
कंपनीने गेल्या 50 वर्षांत काम केलेल्या सर्वात मोठ्या सुपरस्टार्सची झलक या लोगोमध्ये दिसते. या लोगोचा संदेश असा आहे की, यशराज फिल्म्सने भारतीय सिनेमाच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे.
आज यश राज फिल्म्सचे संस्थापक यश चोप्रा यांचा वाढदिवस देखील आहे. यश राज फिल्म्सची स्थापना निर्माता दिग्दर्शक यश चोप्रा यांनी केली होती, पण नंतर त्याचा मोठा मुलगा आदित्य चोप्रा यांनी कंपनीची सर्व धुरा सांभाळली आहे.
यशराज फिल्म्सबद्दल बोलायचे झाले तर, त्याची स्थापना १९७१मध्ये झाली होती, यशराज बॅनरचा पहिला चित्रपट दाग होता, ज्यामध्ये राजेश खन्ना यांनी मुख्य भूमिका साकारली होती. यश चोप्राने या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही जिंकला होता. आदित्य चोप्रानेही आज एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने या निर्मितीसंदर्भात बऱ्याच खास गोष्टी सांगितल्या आहेत. वडिलांच्या वाढदिवशी ते भावूकही झाले.
यशराज फिल्म्स आपला 50वा वर्धापन दिन भव्य पद्धतीने साजरा करणार होते. पण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे.