मनाली- गृह मंत्रालयाकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मिळालेली 'वाय' श्रेणीची सुरक्षा टीम सोमवारी रात्री उशिरा मनालीला पोहोचली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत कंगना मनालीहून मुंबईला रवाना होईल.
हे संरक्षण गृह मंत्रालयाने कंगनाला प्रदान केले आहे. या सुविधेबद्दल तिने गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. सोमवारी पोलीस कर्मचार्यांनी हिमाचल सरकारच्या वतीने कंगनाच्या घरात बंदोबस्त ठेवला आहे. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या ‘वाय’ श्रेणीच्या सुरक्षेमुळे आता कंगनाच्या घराची सुरक्षा अधिक कडेकोट झाली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात ट्विटर वॉर झाले होते. त्यामध्ये कंगनाने बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असे म्हटले होते. त्यानंतर, इतकी भीती वाटते तर, मुंबईलाच येऊ नकोस, असा सल्ला राऊत यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर कंगना मुंबईत परतण्याची तयारी करीत आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सुरक्षेमुळे तिचा मुंबईत येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.