मुंबई - तेलुगु अभिनेता विजय देवराकोंडा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. करण जोहरच्या आगामी सिनेमात तो झळकणार आहे. करणसाठी सदैव स्मरणात राहील असा चित्रपट देण्यासाठी तो कटिबध्द झालाय.
विजय देवराकोंडाने त्याच्या वाढदिवशी करण जोहरने दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करताना करणला हे वचन दिलंय.
विजयचा ९ मे रोजी ३१ वा वाढदिवस होता. हा दिवस खास करण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये करण जोहरनेही सोशल मीडियावरुन त्याला शुभेच्छा देत त्याच्या आगामी सिनेमासाठीही सदिच्छा दिल्या होत्या.
करणने विजय देवराकोंडासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. दिग्दर्शक पुरी जगन्नाथसोबत आगामी चित्रपटात तो झळकणार असल्याचे संकेतही शुभेच्छा देताना करणने दिले होते.
विजयनेही लगेचच करण जोहरला प्रतिसाद देत शुभेच्छांचा स्वीकार केला होता.
"करण, आपण जे भारतासाठी बनवणार आहोत ते सेलेब्रेट करण्यासाठी मी प्रतीक्षा करु शकत नाही. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आपला आभारी आहे. एक संस्मरणीय चित्रपट देण्याची माझी जबाबदारी आहे, असे मला वाटते." असे विजयने आपल्या प्रतिक्रियेच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुरी जगन्नाथ दिग्दर्शित करणार असलेला आगामी चित्रपट विजय देवराकोंडाच्या करियरमधील महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय या चित्रपटात पहिल्यांदा अॅक्शन पॅक्ड भूमिकेत झळकणार आहे. यासाठी तो सिक्स पॅक अॅब बनवत असून या प्रोजेक्टसाठी तो थायलंडमध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग घेत आहे. या सिनेमात अनन्या पांडे हिचीही भूमिका असेल.
करण जोहर आणि अपूर्वा मेहता हा चित्रपट हिंदीमध्ये प्रेझेन्ट करणार आहेत. त्यासोबतच दक्षिणेतील सर्व भाषामध्ये या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.विजयचा अलिकडे 'वर्ल्ड फेमस लव्हर' हा चित्रपट तेलुगुमध्ये हिट ठरला होता.