मुंबई - नेहमी चर्चेत आणि वादात राहणारी अभिनेत्री कंगना रानावतने ट्विटरवर एन्ट्री केली आहे. आजपर्यंत ती टीम कंगना रनौत या ट्विटर अकाऊंटवरुन आपली विचार मांडत होती. मात्र तिने स्वतःच्या नावाने ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. यावर तिने एक व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ट्विटरची ताकद समजल्यामुळे स्वतःचे अकाऊंट सुरू केल्याचे तिने म्हटले आहे.
''सुशांतसिंहला न्याय मिळवून देण्यासाठी सगळं जग एकवटलं होतं. त्यामुळे त्याला न्याय मिळत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियाची ताकद यातून मला दिसून आली आणि त्यामुळेच मी ट्विटरवर पदार्पण केले आहे. सोशल मीडियामुळे अनेक आशा पल्लवीत झाल्या असून देशाच्या विकासातही या मीडियाची महत्त्वाची भूमिका आहे'', असे कंगनाने म्हटलंय.
''यापूर्वी मी थेट तुमच्याशी संवाद साधत नव्हते. कारण मी तुच्यापासून लांब असल्याचे कधी समजत नव्हते. माझे विचार माझ्या सिनेमामधून व्यक्त करीत होते. पण मला सोशल मीडियाची ताकद समजली आहे आणि म्हणून मी ट्विटरवर आले आहे.'', असेही तिनं म्हटलंय.
कंगना सोशल मीडियावर सक्रिय होती. परंतु तिचे ट्विटर कंगना रनौत टीम या नावाने सक्रिय होते. आता तिने स्वतःच्या नावे अकाऊंट उघडले आहे.