मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, सुशांतच्या मॅनेजरने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण काय असू शकते, याचा तपास सुरू आहे.
सुशांतचा जन्म बिहारच्या पाटण्यात 21 जानेवारी १९८६ झाला. सुशांतने मॅकेनिकल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले होते. सुशांत सिंह राजपूतने त्याच्या करीअरची सुरुवात 'किस देश मे है मेरा दिल' या मालिकेतून केली. मात्र, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. ती मालिका अर्ध्यावर सोडून सुशांतने त्याची पावले मोठ्या पडद्याकडे वळवली. सुशांतने 'कायपो चे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, सोनचिढीया आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.