मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधीत ड्रग प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आलंय. अभिनेता अर्जुन रामपालची मैत्रिण गॅब्रिएला देमेट्रियॅडच्या भावाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी अटक केली. एनसीबी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एजिसिलाओस डीमेट्रियॅडस याला ड्रग कायदा अंमलबजावणी एजन्सीने तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सुशांतच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सशी दक्षिण आफ्रिकेचा नागरिक एजिसिलाओस संपर्कात होता, असा आरोप एनसीबी अधिकाऱ्याने केला. स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.
यापूर्वी एनसीबीने सुशांतची माजी मैत्रिण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, वैयक्तिक कर्मचारी दीपेश सावंत आणि इतर अनेकांना अटक केली आहे. या प्रकरणात रियाला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळला होता. मात्र त्या आधी तिला २८ दिवस तुरूुगात घालवावे लागले होते.
एनसीबीने या प्रकरणात दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचीही चौकशी केली आहे. धर्मा प्रॉडक्शन्सचा माजी कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसाद यालाही एनसीबीने अटक केली आहे.
१४ जून रोजी सुशांत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सक्तवसुली संचालनालयाच्या विनंतीवरून ड्रगशी संबंधित अनेक कथित चॅटच्या चौकशीनंतर एनसीबीने गुन्हा नोंदवला असून आणि तपास सुरू केला आहे.