गेल्यावर्षी कोरोना तडाख्यामुळे चित्रपटसृष्टी हतबल झाली होती. अनेक तयार चित्रपटांच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक कोलमडून पडले होते कारण चित्रपटगृहे पूर्णतः बंद होती. अनेक चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा मार्ग निवडला परंतु काही चित्रपटांचा आवाका एव्हडा मोठा असतो की त्यांची लज्जत चाखायला मोठ्या पडद्यांचीच गरज असते. त्यातीलच एक म्हणजे रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’, जो त्याच्या ‘कॉप युनिव्हर्स’ मधील अजून एक चित्रपट. सिंघम आणि सिम्बानंतर रोहित शेट्टी ने ‘सूर्यवंशी’ प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हा चित्रपट मार्च २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता आणि त्याच्या ट्रेलर ने चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढविली होती. परंतु त्याच सुमारास कोविड १९ ही महामारी आली आणि संपूर्ण जगाबरोबर भारतातही लॉकडाऊन लागला.
मध्यंतरीच्या काळात कोरोना परिस्थिती सुधारताना दिसत होती आणि त्यानुसार ‘सूर्यवंशी’ सिनेमागृहांत प्रदर्शनाची तयारी करीत होता. जवळपास चारदा या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलावी लागली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर काही राज्यांमध्ये चित्रपटगृहे उघडली गेली होती परंतु महाराष्ट्रात ती बंद होती. काही चित्रपटांनी तरीही रिलीज होणे पसंद केले परंतु महाराष्ट्रातून, आणि खासकरून मुंबईतून, बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई होत असते म्हणून अनेक निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट प्रदर्शित केले नाहीत. महाराष्ट्रातील सिनेमागृहे उघडण्याची वाट पाहणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘सूर्यवंशी’ आघाडीवर होता. ऑक्टोबर २२ पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहे, काही निर्बंधांसह, उघडण्यात आली आणि ‘सूर्यवंशी’ ने दिवाळी चा मुहूर्त निवडला.
खरंतर ‘सूर्यवंशी’ हा खूप मोठा चित्रपट समजला जात होता आणि त्याच्या प्रदर्शनाकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे डोळे लागले होते. कोरोना आघात, लोकांची कमी झालेली मिळकत, महामारीची भीती आणि ओटीटी ची लागलेली चटक यामुळे सिनेगृहात प्रेक्षक कितपत येईल अशी शंका प्रत्येकाच्या मनात होती. तसेच तिकीटविक्रीमार्फत चित्रपटांना किती परतावा मिळेल याकडे देखील इतर निर्मात्यांचे लक्ष होते. परंतु आता चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे याचे कारण म्हणजे ‘सूर्यवंशी’ ने पहिल्या विकेंडलाच १०० कोटींचा पल्ला पार केला.