हैदराबाद- जगभरात वेगाने पसरत असलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एसएस राजामौली यांनी त्यांच्या मेगा-बजेट आगामी पॅन इंडिया चित्रपट 'RRR' बाबत मोठी जोखीम घेतली आहे. कोरोना विषाणूमुळे पुन्हा एकदा देशातील सिनेमागृहे बंद होणार आहेत. याबाबत दिग्दर्शक राजामौलीने स्पष्टपणे सांगितले आहे की, 'RRR' हा चित्रपट कोरोना व्हायरसच्या काळात त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रदर्शित होणार आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर दिग्दर्शक एसएस राजामौलीसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर करत तरण आदर्शने लिहिले की, 'RRR' चित्रपटाची रिलीज डेट पुढे जाणार नाही. हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्याने स्वतः पुष्टी केली आहे की हा बिग बजेट चित्रपट नियोजित तारखेला पडद्यावर येईल."
एसएस राजामौली यांनी कोरोना विषाणूमुळे चित्रपटाची रिलीज डेट आधीच बदलली आहे. यापूर्वी हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता.
पण, राजामौली आता चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते म्हणाले की मी चित्रपट रिलीज पुढे ढकलणार नाही. राजधानी दिल्लीतील वाढत्या केसेस पाहता सिनेमागृहांना टाळे लावण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये केवळ 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे.