मुंबई -अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित 'सूर्यवंशी' चित्रपट २७ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, सध्या देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख काही काळाकरीता पुढे ढकलली आहे. त्यामुळे चाहत्यांना आणखी काही दिवस या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.
रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामातील 'सूर्यवंशी' हा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. मात्र, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्वाची असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारने याबाबत आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वर्षभर प्रचंड मेहनत आणि समर्पणाने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चित्रपटाची टीम देखील या चित्रपटासाठी उत्सुक होती. प्रेक्षकांचे आरोग्य आणि सुरक्षितता यामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. जेव्हा योग्य वेळ असेल, तेव्हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे.
'सूर्यवंशी' प्रमाणेच हॉलिवूडच्या 'नो टाईम टू डाय' या जेम्स बॉन्डच्या चित्रपटाची तारीखही प्रचंड लांबणीवर पडली आहे. कोरोना विषाणूमुळे कलाविश्वालाही आर्थिक फटका बसला आहे. अनेक सेलेब्रिटींनी आपले विदेश दौरे रद्द केले आहेत. तसेच, आगामी चित्रपटांचे शूटिंगही पुढे ढकलण्यात आले आहेत.