मुंबई -अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारी गायिका श्रेया घोषाल आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या सुरेल आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेयाचा आवाज तर चांगला आहेच पण ती खूप सुंदरही आहे. श्रेयाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. ती अनेकदा स्वतःचे आणि तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिका श्रेया घोषालने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम , तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे. श्रेयाने सा रे ग म प ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने देवदास या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार तसेच फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाले. तेंव्हापासून तिने सुमारे २०० हून अधिक चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार व ७ दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
श्रेया मार्च १२, १९८४ रोजी दुर्गापूर येथील बंगाली कुटुंबात जन्मली. ती रावतभाटा या राजस्थानातील छोट्या गावात वाढली. तिचे वडील बिश्वजीत घोषाल हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण कोट्यातील महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले.