‘कबीर सिंग’च्या दमदार यशानंतर शाहिद कपूर ‘जर्सी’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतत आहे. हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत असून ‘जर्सी’ चे प्रोमोशन जोरदार पद्धतीने सुरु आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘जर्सी’चे पोस्टर चित्रपटाबाबत उत्सुकता वाढविणारे आहे. ‘जर्सी’ या चित्रपटात वडील-मुलाच्या नात्यावर बेतलेला असून तेच त्याच्या पोस्टर मधून अभिप्रेत होते. शाहिद कपूरची भूमिका असलेला अर्जुन त्याचा मुलगा किट्टू, बालकलाकार रोनित कामराने ही भूमिका साकारली आहे, याच्या बुटाच्या लेसेस बांधताना दिसत आहे. अर्जुन आणि किट्टू यांच्यातील भावनिक बंधाचे प्रतीक असलेले पोस्टर चित्रपटातील एक ‘मोमेन्ट’ कॅप्चर करण्यात यशस्वी होते.
चित्रपटाची कथा एका अपयशी व अयशस्वी क्रिकेटरभोवती फिरते, जो आपल्या मुलासाठी एक क्रिकेटची ‘जर्सी’ विकत घेण्यासाठी धडपडत असतो. या चित्रपटातून मानवी, खासकरून बाप-लेकाच्या, भावभावनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जर्सी हा मानवी भावनांचा उत्सव आहे असेही म्हणता येईल. स्वप्नांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास मदत करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आसनावर बांधून ठेवेल. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर असून त्यांची पहिल्यांदाच जोडी जमलेली आहे. ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर, जे खऱ्या आयुष्यात शाहिद कपूर चे वडील आहेत, मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत या चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.