मुंबई - 'केजीएफ 2' या आगामी चित्रपटात भूमिका करीत असल्याचा खुलासा संजय दत्तने त्याच्या वाढदिवसानिमित्य केला आहे. यातील व्यक्तीरेखेबद्दलही काही मनोरंजक गोष्टीही त्याने सांगितल्या. यंदाच्या वाढदिवसाला दोन महत्त्वाच्या गोष्टी संजूबाबाच्या बाबतीत घडल्या आहेत.
सर्वात पहिले म्हणजे 'केजीएफ 2'मधील त्याचा लूक प्रदर्शित झाला आहे. दुसरं म्हणजे त्याच्या होम प्रॉडक्शनच्यावतीने निर्मित होत असलेल्या 'प्रस्थानम' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यावेळी बोलताना त्याने 'केजीएफ 2'च्या 'अधिरा' या व्यक्तीरेखेबद्दलचा खुलासा केलाय.
'केजीएफ 2' चित्रपटातील अधिरा ही व्यक्तीरेखा अत्यंत खतरनाक आहे. यासारख्या भूमिकांचा तो नेहमीच शोध घेत असतो. संजय म्हणाला की, ''अधिराची व्यक्तीरेखा खूप पॉवरफुल्ल आहे. जर तुम्ही अॅव्हेंजर्स पाहिला असेल तर तुम्हाला थानोस माहिती असेल. अधिरा त्याच्यासारखा आहे. खतरनाक गेटअपसारखीच ही व्यक्तीरेखा खतरनाक आहे. मी अशाच प्रकारच्या व्यक्तीरेखेच्या शोधात होतो."
संजू बाबा पुढे म्हणाला, ''प्रेक्षकांना मला मोठी भेट दिली आहे, जी त्यांचे प्रेम आणि सन्मानाची गोष्ट आहे. भूतकाळात जे काही घडले त्यातही त्यांनी माझी साथ दिली. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो.''
'प्रस्थानम' हा २०१० मध्ये आलेल्या तेलुगु चित्रपटाचा रिमेक आहे. यात संजय दत्तसोबत जॅकी श्रॉफ, मनीषा कोइराला, अली फजल, अमायरा दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २० सप्टेंबरला रिलीज होणार आहे.